भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशात मोठा राजकीय वाद पेटला आहे दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये आज महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. १५ जूनपर्यंत पोलीस चौकशी पूर्ण करण्याचं आश्वासन आंदोलक कुस्तीपटूंना देण्यात आलं आहे. त्यानंतर या कुस्तीपटूंनी १५ जूनपर्यंत कुठलेही आंदोलन केले जाणार नाही, असे सांगितले. कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून वाद पेटला असताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रित केले होते.
या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मी कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. तसेच ही बैठक सकारात्मक मुद्द्यांवर समाप्त झाली. आम्ही सहा तास चर्चा केली. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यामध्ये जे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याचा तपास करून १५ जूनपर्यंत चार्जशिट देण्यात यावी. तसेच ३० जूनपर्यंत निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्याबरोबरच एक इंटर्नल कप्लेंट समिती बनवण्यात यावी. त्याचं अध्यक्षपद महिलेकडे देण्यात यावे. जेव्हा डब्ल्यूएफआयच्या निवडणुका होतीत. तेव्हा चांगले पदाधिकारी निवडून यावेत. त्यासाठी खेळाडूंचं मत विचारात घेण्यात यावं. बृजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित लोक निवडून येता कामा नयेत, या खेळाडूंच्या मागण्या होत्या. खेळाडूंविरोधात जे खटले दाखल आहेत, ते मागे घेण्यात यावेत. या सर्वांवर एकमत झालं आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंनी सांगितले की, जोपर्यंत डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना तुरुंगात पाठवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. या प्रकरणी तपास संथगतीने सुरू आहे, असे कुस्तीपटूंना वाटते. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेसाठी विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे सातत्याने मागणी करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुस्तीपटूंसोबत चर्चा केल्यानंतर काही दिवसांतच सरकारने आंदोलनकर्त्यां कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. याबाबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून सांगितले की, सरकार कुस्तीपटूंसोबत त्यांच्या मु्द्द्यांवर चर्चा करण्यास इच्छुक आहे. मी कुस्तीपटूंना पुन्हा एकदा चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.