लखनौ-
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये अमृतसरहून कोलकाताला जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेस ट्रेनमध्ये टीटीईनं एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. महिला प्रवाशानं आरडाओरडा केल्यानंतर तिचा पती आणि इतर प्रवाशांनी टीटीईला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपी टीटीई याला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राजेश आपल्या पत्नीसोबत अकाल तख्त एक्स्प्रेसच्या A-1 कोचमधून प्रवास करत होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास राजेश याची पत्नी सीटवर झोपली होती. सहारनपूरमध्ये तैनात टीटीई मुन्ना कुमार यानं त्याच सीटजवळ येऊन लघुशंका केली. राजेश याच्या पत्नीला जाग आली आणि तिनं घडत असलेला सगळा प्रकार पाहताच आरडाओरड सुरू केली. त्यानंतर इतर प्रवासी आणि राजेश यानं तात्काळ टीटीईला पकडलं. सहप्रवाशांनी टीटीईला बेदम मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.
टीटीई मद्यधुंद अवस्थेत होता असंही सांगितलं जात आहे. जीआरपी सीओ संजीव नाथ सिन्हा यांनी सांगितलं की आरपीएफ कंट्रोल रुम आणि ट्विटरच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाल्याचं सांगितलं. एक दाम्पत्य बिहारहून येत असताना चारबाग रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहोचण्यापूर्वी मुन्ना कुमार नावाच्या टीटीनं महिला प्रवाशावर लघुशंका केली अशी माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही तातडीनं चारबाग रेल्वे स्थानकावर पोहोचलो, असं जीआरपी सीओ संजीव नाथ सिन्हा यांनी सांगितलं.
आरोपी टीटी याला रेल्वेतून खाली उतरवण्यात आलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीटीवर आयपीसी कलम ३५२, ३५४(अ) आणि ५०९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याआधी विमान प्रवासात महिला प्रवाशावर लघुशंका केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. आता चक्क रेल्वे प्रवासातही तशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे.