काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेपाळमधील व्हिडिओनंतर, आता भाजपने आणखी एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर निशाना साधला आहे. यावेळी, व्हिडिओ शेअर करत, काँग्रेस अनेक समस्यांचा सामना करत असताना, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मात्र, पार्टीत व्यस्त आहेत, असा दावा भाजपने केला आहे. एवढेच नाही, तर INC म्हणजे, 'आय नीड सेलिब्रेशन अँड पार्टी' असेही भाजपने म्हटले आहे. राजस्थानातील उदयपूर येथे शुक्रवारपासून काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरू होत आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी गुरुवारी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत पुनावाला म्हणाले, 'ट्रेनिंग? पार्टी? महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा कॅम्प. व्हिडिओ बघा आणि गाणे ऐका.' ते पुढे म्हणाले, 'राहुल नेपाळमधील पबमध्ये आहेत. ज्युनिअर नेते 'पार्टी ट्रेनिंग' कॅम्पमध्ये आहेत. जसे नेते तसे फॉलोअर. पक्षाला जबर मार पडला आहे. पण पक्ष असाच सुरू राहील!' एवढेच नाही, तर पार्टीच्या कामापेक्षाही, मोठी पार्टी आहे, असेही पुनावाला म्हणाले.
आणखी एका ट्विटमध्ये पुनावाला म्हणाले, INC म्हणजे I Need Celebration And Party. पार्टी ट्रेनिंग कॅम्प सुरू असून 'जैसा राजा (राहुल) वैसी प्रजा (युथ काँग्रेस)," असे म्हणतही पुनावाला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळच्या एका पबमधील व्हिडीओही व्हायरल झाला होता. यानंतर त्यांना भाजपाने ट्रोलही केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी, राहुल गांधी काठमांडू येथे मित्राच्या लग्नासाठी गेले होते, असे स्पष्टिकरणही दिले होते.