लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST2024-07-04T18:26:56+5:302024-07-04T18:28:37+5:30
Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. तसेच इंडिया आघाडीसोबत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले होते. तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत जागांची संख्या दुपटीने वाढून ९९ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. ज्या राज्यांमधील काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया आघाडी कायम राहावी, असं वाटेल, तिथे आघाडी कायम राहिली.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोघेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका नियोजित आहेत.
पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी कायम राहील का असं विचारलं असता जयराम रमेश यांनी सांगितलं की, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. महाराष्ट्रामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. तर पंजाबमध्ये इंडिया आघाडी नाही आहे. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा आम आदमी पक्षाला दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहील, असं मला वाटत नाही. दिल्लीमधील आपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होणार नाही, असं विधान केलं होतं, असे जयराम रमेश यांनी सांगितले.