बंगळुरू : चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य-एल १ अंतराळयानाचे येत्या २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी प्रक्षेपण करणार आहे. सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदविण्यासाठी आदित्य-एल १ हे अवकाशयान बनविण्यात आले आहे. ते सौरवायूच्या स्थितीचीही नोंद करणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावरील लॅगरेंज पाॅइंट ‘एल-१’ येथून ‘आदित्य एल १’ यान अभ्यास करणार आहे. भारताने हाती घेतलेली ही पहिलीवहिली मोहीम असून त्यासाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
आदित्य-एल १ यान अवकाशात केले जाईल प्रक्षेपित - इस्रोने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पीएसएलव्ही-सी ५७ या रॉकेटच्या साहाय्याने आदित्य-एल १ यान अवकाशात प्रक्षेपित केले जाईल. - सूर्याचा सर्वांत बाह्य थर कोरोना तसेच फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअरस यांचा अभ्यास आदित्य-एल १ मधील सात उपकरणांद्वारे केला जाणार आहे.
नासानेही केला होता सूर्याचा अभ्याससूर्याचे बाह्य आवरण असलेल्या कोरोनामध्ये नासाच्या पार्कर या अवकाश यानाने १४ डिसेंबर २०२१ रोजी प्रवेश करून तेथील पार्टिकल व चुंबकीय क्षेत्राच्या घटकांचे नमुने गोळा केले होते. अंतराळ संशोधन क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणतेही अवकाशयान सूर्याच्या इतके जवळ गेले होते.