नवी दिल्ली – आदित्य एल १ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रयान ३ च्या प्रज्ञान रोव्हरबाबत इस्त्रो प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रज्ञान रोव्हर आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर १०० मीटर चालला आहे. विक्रम लँडर आणि रोव्हर दोन्हीही उत्तमप्रकारे काम करत आहेत. दोघांचे सर्व पेलोड्स योग्य रितीने सुरळीत सुरू आहेत असं एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे.
याआधी रोव्हरने विक्रम लँडरचा जबरदस्त फोटो घेतला. समोर आलेला खड्डा चुकवत त्याने स्वत:चा मार्ग बनवला. हे फोटो नेविगेशन कॅमेऱ्यातून घेतले जात आहेत. हा कॅमेरा लेबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिस सिस्टमने बनवण्यात आला आहे. प्रज्ञान रोव्हरच्या एकाबाजूला दोन कॅमेरे लागले आहेत. रोव्हरचे एकूण वजन २६ किलो आहे. ते ३ फूट लांब, २.५ फूट रुंद आणि २.५ फूट उंच आहे. प्रज्ञान रोव्हर त्याच्या सहा चाकांवर चंद्राच्या पृष्ठभागी फिरत आहे. प्रज्ञान रोव्हरचे टार्गेट चंद्रावरील १ दिवस पूर्ण होण्याआधी ५०० मीटर प्रवास करणे. तो सातत्याने १ सेंटीमीटर प्रतिसेकंद वेगाने पुढे जात आहे. पुढील ५-६ दिवसांत चंद्राच्या पृष्ठभागावर तो तोपर्यंत काम करेल जोपर्यंत सूर्यापासून त्याला ऊर्जा मिळेल. तोपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागाचे आणि विक्रमचे फोटो काढत राहील.
प्रज्ञान रोव्हरमध्ये कोणकोणते यंत्र आहे?
सर्वात आधी सोलर पॅनेल, म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर ऊर्जा घेऊन तो काम करेल.
त्याच्या खाली सोलर पॅनेल हिंज, म्हणजे हा पॅनेल रोव्हरशी जोडलेला आहे.
२ NavCam म्हणजे नेविगेशन कॅमेरा, ही २ कॅमेरा रोव्हरचे डोळे आहेत.
त्याखाली चेसिस पाहू शकता
सोलर पॅनेल खाली आल्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी लावलेला सोलर पॅनेल होल्ड डाऊन
सहा व्हिल ड्राईव्ह, म्हणजे रोव्हरला फिरण्यासाठी लावलेली चाके
त्याशिवाय रॉकर बोगी आहे, जी चाकांना ओबडधोबड जमिनीवर चालण्यासाठी मदत करते.
रोव्हरच्या खालील बाजूस रोव्हर होल्ड डाऊन आहे. जर रोव्हर चालू शकला नाही तर तो जमिनीला पकडून एका जागेवर टिकू शकेल.
वार्म इलेक्ट्रॉनिक्स बॉक्स म्हणजे अशी इलेक्ट्रॉनिक सिस्टम जी उच्च तापमानात योग्यरित्या काम करू शकेल. रोव्हरला दिलेल्या कमांडनुसार ते काम करेल.
डिफ्रेंशियल्स म्हणजे प्रत्येक यंत्र आणि भागाला वेगवेगळे ठेवण्यासाठी बनवलेली भिंत, ज्यावर एँटिना आहे तो लँडरसोबत संपर्क साधण्यासाठी बनवण्यात आला आहे.