कर्नाटकातील विजयानंतर तेलंगणात काँग्रेस ॲक्टीव्ह! 5G फॉर्म्युलावर करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 04:31 PM2023-09-10T16:31:27+5:302023-09-10T16:31:46+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी १७ सप्टेंबर रोजी रॅलीसाठी येणार आहेत.
काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. आता काँग्रेसने तेलंगणातील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जाहीर सभा आयोजित केली असून या सभेसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. तेलंगणातील जनतेसाठी पाच 'गॅरंटी' (5G) जाहीर करणार' असल्याची माहिती काँग्रेस तेलंगणा युनिटचे अध्यक्ष आणि खासदार ए रेवंत रेड्डी यांनी दिली.
भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड
रेड्डी म्हणाले, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सभेत पाच 'गॅरंटी' जाहीर करतील. १७ सप्टेंबर रोजी निवडणूक हमीपत्र जाहीर करणार आहेत.
पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक १६ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे होणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. १७ सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे, यामध्ये सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख सहभागी होणार आहेत.
१७ सप्टेंबर रोजी तेलंगणाचे विलीनीकरण झाले
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने एकूण ११९ विधानसभा जागांपैकी ११५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. १७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक कार्यक्रम पाहिले जाऊ शकतात, कारण याच दिवशी १९४८ मध्ये, हैदराबादचे पूर्वीचे संस्थान निजाम राजवटीत भारत संघात विलीन झाले होते.
हा दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी हैदराबादमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे मानले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे केंद्राने आयोजित केलेल्या 'मुक्ती दिना'च्या अधिकृत कार्यक्रमात भाग घेतला होता आणि यावर्षीही ते तेलंगणाच्या राजधानीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तेलंगणा शेतकरी सशस्त्र संघर्ष (१९४६-५१) च्या स्मरणार्थ ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाचे नेतृत्व कम्युनिस्ट नेत्यांनी केले.