तालचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये आज विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ओडिशातील बिजू जनता दलावर आरोप करत मुख्यमंत्री नविन पटनायक यांच्यावर टीका केली. तसेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा दावाही केला. मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि मीच उद्घाटनाला येईन, असे त्यांनी सूचित केले.
महत्वाचे म्हणजे या भाषणात मोदी यांनी काँग्रेसवर खूपच कमी आरोप केले. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख पटनायकच होते. यामुळे पंतप्रधानांनी जाहीरपणे पुढील काळात ओडिशामध्ये भाजप विरोधात बीजेडी असणार असल्याचे संकेत दिले.
मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यावर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2000 मध्ये तालचर खत निर्मितीच्या कारखान्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा कारखाना धूळ खात पडून होता. अधिकाऱ्यांनी 36 महिन्यात या कारखान्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 36 महिन्यांनी मी या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. गोरखपूर, झारखंड, तेलंगानामधील खत निर्मितीच्या कारखान्यांची उदाहरणे देताना मोदी म्हणाले, तेथील सरकारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत. राजीव गांधी म्हणाले होते, एक रुपयापैकी 15 पैसेच लोकांपर्यंत पोहोचत होते. आज बँकिंग प्रणालीमुळे अख्खा रुपया जनतेपर्यंत जात असल्याचे मोदी म्हणाले.
स्वच्छता मोहिमेवरून पटनायक यांच्यावर आरोप करताना मोदी म्हणाले की, 2014 मध्ये गावांतील स्वच्छता केवळ 10 टक्के होती. आमच्या सरकारने त्यामध्ये वेग आणून 55 टक्के केली आहे. पटनायकना तेव्हा सांगितले होते, की देश पुढे जातोय ओडिशा मागे राहील. स्वच्छतागृह बनली नाहीत. ओडिशाच्या जनतेला चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात झारसुगुडा येथील विमानतळाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री नविन पटनायक उपस्थित होते.