तीन वर्षानंतरही मोदींची लोकप्रियता कायम, 'अच्छे दिन' येत असल्याचा लोकांचा विश्वास - सर्व्हेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 10:47 AM2017-11-16T10:47:39+5:302017-11-16T17:14:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्यापही लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहे. इतकंच नाही तर देशाच्या आर्थिक स्थितीवर लोक समाधानी आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्यापही लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहे. इतकंच नाही तर देशाच्या आर्थिक स्थितीवर लोक समाधानी आहेत. अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्चच्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तीन वर्षातील हनीमून पीरिअड भलेही संपला असला, तरी लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कमी झालेला नाही. जवळपास 10 पैकी 9 भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. 2015 मध्ये हा आकडा 10 पैकी 7 होता.
प्यू रिसर्च संस्थेने 2464 भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. 21 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. महत्वाचं म्हणजे या सर्व्हेक्षणात मोदी 88 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 58 टक्क्यांसह दुस-या क्रमांकावर आहेत. तिस-या क्रमांकावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (57 टक्के) आहेत.
सर्व्हेक्षणानुसार मोदींची लोकप्रियता एखाद्या विशेष ठिकाणापुर्ती मर्यादित नसून संपुर्ण भारतभर आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही 10 पैकी 9 लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे. दुसरकीडे गुजरात, महाराष्ट्र यांच्याशिवाय छत्तीसगडमधील जनताही मोदींसाठी सकारात्मक आहे.
74 टक्के लोकांची मोदींनी पसंती
याशिवाय पूर्व भारत म्हणून ओळखल्या जाणा-या बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालसहित उत्तर भारतातील राज्यं दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील 10 पैकी 8 लोकांनी मोदींच्या बाजूने मत मांडलं आहे. 2015 नंतर उत्तर भारतात मोदींच्या लोकप्रियतेत कोणताही प्रभाव पडलेला नाही. दुसरीकडे दक्षिण आणि पश्चिम भारतात तर त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. पुर्व भारतमध्ये लोकप्रियता थोडी कमी झाल्याचं पहायला मिळालं. सर्व्हेक्षणानुसार, लोकप्रियतेच्या बाबतीच मोदींनी इतर नेत्यांना खूप मागे टाकलं आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधींपेक्षा मोदींची लोकप्रियता जास्त
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी तुलना करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता 31 टक्के आणि राहुल गांधींशी तुलना करता 30 टक्के जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 88 टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे, जर सोनिया गांधींवर 57 आणि राहुल गांधींवर 58 टक्के लोकांनी विश्वास दाखवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 39 टक्के भारतीयांची निवड आहे.