Opposition Party INDIA Tagline: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून २४ विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरू येथे पार पडली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आता विरोधी पक्षांच्या आघाडीची टॅगलाइनही निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीचा सामना करण्यासाठी स्थापन झालेल्या २६ विरोधी पक्षांच्या मंगळवारी बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत 'इंडिया' हे नाव विरोधी आघाडीसाठी निश्चित केल्यानंतर आता विरोधी पक्षांनी या आघाडीची टॅगलाइनही निश्चित केली आहे. 'जीतेगा भारत' ही इंडिया आघाडीची टॅगलाइन असेल. याबाबत मूळ सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. आघाडीची टॅगलाइन ठरवण्यासाठी अनेकदा संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधी आघाडीला हिंदी टॅगलाइन असावी, असे सुचवले. ही सूचना मान्य झाल्यावर 'इंडिया'ची टॅगलाइन 'जीतेगा इंडिया' अशी निश्चित करण्यात आली.
आता मुंबईतील बैठकीकडे लक्ष
या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे दिल्लीत एक मध्यवर्ती कार्यालय लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच विरोधी आघाडीतील ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून मुंबईमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत त्या सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटासाठी मुंबईतील बैठक महत्त्वाची मानली गेली आहे. त्यामुळे विरोधकांच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे आता लक्ष लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव 'इंडिया' म्हणजेच इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स असे ठेवले आहे. बेंगळुरूमध्ये दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला व तशी घोषणाही करण्यात आली.