निवडणूक विश्लेषण, अभय कुमार दुबे नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आम्हाला सरकार स्थापन करण्यायोग्य जागा मिळतील, पण कमतरता भासल्यास अपक्षांच्या मदतीने काम चालविले जाईल, असे भाजपच्या एका प्रवक्त्याने मला एक्झिट पोलच्या दिवशी ‘आॅफ द रेकॉर्ड’ सांगितले होते. याचा अर्थ या राज्यात भाजपची लाट असल्याबाबत पक्षनेतृत्वाला खात्री नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होणार, ही भविष्यवाणी भाजपचे नेते करू शकत नव्हते. त्यामुळेच भाजपचे समर्थकही या निकालाने अचंबित झाले आहेत. विरोधक भुईसपाट झाले आहेत. उत्तर प्रदेशात कुणाचीही लाट नसल्यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची भाषा करणाऱ्यांची हवाही निघून गेली आहे.भाजपने हे अभूतपूर्व यश कसे मिळविले, हा प्रश्न पडतो. त्याची अनेक कारणे आहेत. या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई व्यक्तीला देणे सहज ठरते. मात्र मोदी तर बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीतही होते. पण तेथे भाजपला विजय मिळवता आला नाही. मोदींच्या व्यक्तिमत्त्वासोबत सामाजिक समीकरण जोडण्यात आलेले अपयश हे त्यामागचे कारण होते. आजवर हिंदूंची मते ही संकल्पना रा.स्व. संघांच्या विचारधारेत कैद झाली होती. उत्तर प्रदेशात भाजपने हिंदूंची मते जोडत ती मुक्त केली. आतापर्यंत हिंदूंच्या ऐक्याच्या नावावर भाजपने उच्चवर्णीय आणि बिगर यादव मागासवर्गीयांची मतेच जोडण्याचे काम केले होते. त्यामुळे या पक्षाला १७० ते २२१ जागांवर समाधान मानावे लागत होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपच्या रणनीतीकारांनी हिंदू मतांच्या ऐक्याला यथार्थ रूप मिळवून दिले.बिगर यादव आणि बिगर जाटव जातींच्या सकारात्मक समर्थनामुळे भाजपला मतांची टक्केवारी ४० पर्यंत नेण्यात यश मिळाले. भाजपने सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा डाव खेळल्याचा आरोप चुकीचा आहे. भाजपने बहुसंख्यक मतदारांना हिंदुत्वाचे स्मरण करवून दिले. त्यामागे समाजवादी पक्ष आणि बसपाची मुस्लीमकेंद्रित रणनीतीही होती. अखिलेश यांचे सरकार स्थापन झाल्यास ते केवळ यादव आणि मुुुस्लिमांचे सरकार असेल. मायावतींचे सरकार आल्यास केवळ जाटव आणि मुस्लिमांचे सरकार असेल, हे ठसवून देण्यात भाजपला यश मिळाले.शहा यांची रणनीती यशस्वी...अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपने हिंदू मतांच्या ऐक्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. विराट हिंदू व्होट बँक एकवटण्यात उच्चवर्णीयांच्या कटिबद्धतेचा समावेश तर आहेच; सोबत गैर-यादव आणि गैर-जाटव जातींच्या सकारात्मक समर्थनाचाही वाटा आहे. संघटनात्मक बदलापासून प्रारंभ...भाजपने निवडणुकीपूर्वी ब्राह्मण नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांना हटवत मागासवर्गीय केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे प्रदेशनेतृत्व सोपविले. अपना दल, सुहैल देव यांच्या पक्षाशी युती केली. अनेक कमकुवत जातींच्या नेत्यांना संघटनात्मक स्थान दिले. उच्चवर्णीयांची मते मिळणारच ही गृहित धरत भाजपने कमकुवत जातींची मते मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले. अखिलेश सरकारने पाच वर्षे अतिरेकी आणि निर्लज्ज यादववाद चालविला होता, तर विरोधी पक्षनेत्या म्हणून मायावती पूर्ण निष्प्रभ ठरल्या होत्या. भाजपच्या यशात त्याचेही योगदान आहे.
उत्तर प्रदेशात अखेर भाजपचे हिंदू कार्ड चालले
By admin | Published: March 13, 2017 1:02 AM