हैदराबाद : संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर उफाळलेल्या आंदोलनानंतर रजेवर गेलेले हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अप्पा राव पोडिले मंगळवारी कामावर परतताच, त्यांना विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या विद्यापीठ आवारातील निवासस्थानाची आणि कार्यालयाची तोडफोड केली. या विद्यार्थ्यांनी कुलगुरू हटावच्या घोषणाही दिल्या. या साऱ्या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात तणाव पसरला आहे.कुलगुरूंनी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या पत्रांच्या आधारे रोहित आणि काही विद्यार्थ्यांवर निष्कारण कारवाई केली असल्याचा आरोप त्याच्या आत्महत्येनंतरही झाला होता. रोहितच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर आणि जवळपास सर्व विद्यापीठांत तसेच संसदेतही उमटले होते. हे कुलगुरू पक्षपाती असल्याची टीका सातत्याने होत होती. कुलगुरूपदी अन्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)
कुलगुरू रुजू होताच तोडफोड
By admin | Published: March 23, 2016 3:30 AM