नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना एक चॅलेंज दिलं आहे. सध्या देशभरातील नागरिक ज्या समस्येमुळे हैराण झाले आहेत, त्या इंधन दरवाढीसंदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा काँग्रेस देशभरात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन उभारेल, अशा स्वरुपाचे चॅलेंज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. ट्विटरवर इंधन दरवाढीसंदर्भातील मुद्दा पोस्ट करत त्यांनी मोदींना चॅलेंज दिलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विट पोस्टला पंतप्रधान मोदी प्रत्युत्तर देणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
(पंतप्रधान नरेंद्र मोदी विराट कोहलीला म्हणाले, 'Challenge Accepted')
तर दुसरीकडे, सरकारने इंधन दर आवाक्यात आणले नाहीत, तर २० जुलैपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक वाहतूकदारांच्या केंद्रीय संघटनेने दिली आहे. सोबतच वाहतूकदारांची राज्यव्यापी संघटना बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बुधवारी बैठक घेत या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. बीजीटीएचे सचिव अनिल विजन म्हणाले, संघटनेच्या पदाधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मशीद बंदर येथे पार पडली. त्यात इंधन दरांमध्ये झालेली वाढ शासनाने कमी केली नाही, तर चक्काजाम आंदोलनात सामील होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. याआधीच गाडीचे स्पेअर पार्ट आणि टायर अशा वस्तूंचा समावेश केंद्र सरकारने चैनीच्या वस्तूंमध्ये केल्याने वाहतूकदारांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. सध्या २८ टक्के जीएसटी आकारणा-या सरकारने १२ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यात वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडल्याचे विजन म्हणाले. इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. ते २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती भायखळा भाजी मार्केट प्रिमायसेस सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली. ते म्हणाले, इंधन दर कमी केले नाही, तर भाज्यांचे दर दुपटीने वाढतील. तूर्तास फरस बी, भेंडी, वांगी, फ्लॉवर या भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत.