इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्ताननेभारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आता जिरली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही. काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाक यांच्यातील तणाव वाढला असताना हा तणाव आणखी जास्त वाढू नये यासाठी आम्ही पुढे गेलो नाही असा सूर लावत नरमल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारतासोबत युद्धाची भाषा केल्यानंतर ही पत्रकार परिषद होत आहे. मागील एक महिन्यापासून जगभरात पाकिस्तानची नामुष्की होत आहे.
अलीकडेच पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सोशल मीडियावर पॉर्न स्टारचा व्हिडीओ पोस्ट करून ती काश्मीरमधील पीडित असल्याचा दावा केला. त्यावरून अनेकांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यानंतर त्या पॉर्नस्टारनेही ट्विट करत तुमचे फॉलोअर्स वाढल्याचा चिमटा अब्दुल बसित यांना काढला.
पाक आर्मीचे प्रवक्ते गफूर यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच भारतासोबत चर्चा करण्याचं बोलून दाखविले होते. तसेच पाकिस्तानच्या भौगोलिक स्थितीला आशियातील देश आणि जगातील शक्ती दुर्लक्ष करु शकत नाही. काश्मीर प्रकरणावरुन पाकिस्तानला जगातील कोणत्याही देशांनी साथ दिली नाही. भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि जगातील अन्य भारताच्या हितामध्ये आहे असं ते म्हणाले.
मेजर गफूर यांनी भारतासोबत चीन, अफगाणिस्तान आणि इराणवरही भाष्य केलं. चीन जगातील विकसित देश आहे. चीनसोबत भारताचे खटके उडतात तरीही दोन्ही देशांचे आर्थिक संबंध स्थिर आहेत. अफगाणिस्तानने फक्त युद्ध, कुर्बानी आणि दहशत हेच पाहिलं आहे. इराणशी संबंधावर त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे इराणसोबत चांगले संबंध आहेत मात्र पश्चिम आशियातील परिस्थिती पाहता त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानात शांतता येईल तर आमचे सैनिक पश्चिमी सीमेवरुन कमी होतील. भारतासोबत युद्धावर त्यांनी सांगितले की, भारताला वाटत असेल पाकिस्तान कमकुवत असेल तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की, युद्ध फक्त हत्यार आणि अर्थव्यवस्थेशी नाही तर देशभक्तीतूनही लढलं जाऊ शकतं. दोन दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्या बोलण्याचा नुरच पालटलेला दिसला होता. लाहोर येथील शीख बांधवांना संबोधित करताना त्यांनी जर तणाव वाढला तर जग धोक्यात येईल, यामुळे पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे म्हटले होतं.