नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिजवी यांनी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. वसीम रिजवी यांनी धर्मांतर केल्यानंतर जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे नवं नाव जोडलं आहे. धर्म बदलल्याने काय होतं? एका व्यक्तीने धर्म बदलला तर त्याची ओळख आणि त्याच्या कुटुंबाचंही धर्मांतर होतं का? असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात पडले आहेत. त्याबद्दल आज जाणून घेऊया.
कुठल्याही नागरिकाची धर्म बदलण्याची प्रक्रिया काय?
इलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश सीबी पांडे यांनी या प्रक्रियेवर म्हटलं आहे की, कायदेशीर पद्धतीने तुम्हाला याबाबत कोर्टाचं प्रतिज्ञापत्र बनवावं लागेल. वडिलांचे नाव देऊन एफिडेविट करावं लागेल. त्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे वृत्तपत्रात जाहिरात देऊन मी धर्म परिवर्तन केल्याचं जाहीर करावं लागेल. सरकारकडून मान्यता मिळावी यासाठी गॅझेट करावं लागेल. या कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते.
धर्मगुरु धर्म परिवर्तन करु शकतो का?
याबाबत निवृत्त जस्टिस सीबी पांडे यांनी म्हटलं की, धार्मिक प्रक्रिया प्रत्येक धर्मात असते. क्रिश्चनमध्ये सरल, मुस्लिमांमध्ये कलमा वाचायला देतात. हिंदु धर्मात अशी कुठलीही प्रक्रिया नाही. आर्यसमाजच्या प्रोटोकॉलनुसार, मंदिरातही शुद्धीचा कार्यक्रम होतो. शुद्धीपुजेनंतर धर्म परिवर्तन होतं. प्रत्येक मंदिरात वेगवेगळी प्रक्रिया केली जाते. केवळ नाव बदलून धर्म बदलता येत नाही. तर हिंदु धर्म एक जीवन प्रक्रिया आहे. पूजापाठ, चारधाम यात्रा हेदेखील स्वीकारावं लागतं
एका व्यक्तीच्या धर्मांतरानंतर बायको-मुलाचाही धर्म बदलतो?
या प्रश्नावर ते म्हणाले की, नवऱ्याच्या धर्मांतरानंतर बायको मुलांचा धर्म बदलत नाही. जर त्यांना बदलायची इच्छा असेल तर ते बदलू शकतात. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. म्हणजे वसीम रिजवी भलेही हिंदु झाले असले तरी त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर झाले नाही.
एका मुस्लिमाने धर्म बदलल्यास कुटुंबावर काय परिणाम होतो?
यावर ज्येष्ठ शिया धर्म गुरु सैफ अब्बास नकवी म्हणाले की, पत्नी शिया असेल तर ते आपोआप ती वेगळी होते. आता ती त्यांच्या पत्नी म्हणून राहू शकत नाही.
वडिलांनी धर्म बदलला तर बायको-मुलांचा अधिकार कुठल्या धर्मानुसार असेल? संपत्ती, लग्न, घटस्फोट यात कुठल्या धर्माचं पालन केले जाईल?
निवृत्त सीबी पांडे यांनी सांगितले की, जो ज्या धर्माचा असेल त्याला तसं पालन करावं लागेल. सर्व मुस्लीम कुटुंब धर्म बदलत असेल तर त्यांना हिंदु धर्माप्रमाणे राहावं लागेल. काही हिंदु असतील, काही मुस्लीम असतील तर जो ज्या धर्माचा असेल तसं वागेल. भलेही वसीम रिजवी यांनी स्वत: हिंदू धर्मात प्रवेश केला असेल परंतु त्यांची पत्नी, मुलं जोपर्यंत इच्छा नसेल तोपर्यंत धर्मांतर करणार नाही. ते मुस्लीमच राहतील.