मुंबई - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. तर भाजपला तीन राज्यांतून आपली सत्ता गमवावी लागली. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. मात्र, सत्ता स्थापन करताना राहुल गांधी यांच्यापुढे मुख्यमंत्रीपदाचा पेच उभा राहिला आहे. कारण, पक्षांतर्गत गटबाजीमुळे राहुल यांना राज्यप्रमुखपदी कोणाला नेमायचं असा प्रश्न पडला आहे.
देशातील हिंदी भाषिक राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगड येथे काँग्रसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार, काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र, या नावांवर एकमत होत नसल्याने राहुल गांधीपुढे संभ्रम निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये जोतिर्रादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यात खलबतं सुरू असल्याचं समजतं. तसेच छत्तीसगडध्ये भूपेश बघेल आणि टीएस सिंहदेव यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मात्र, काँग्रेसने प्रचार करताना सचिन पायलट, ज्योतिर्रादित्य सिंधिया यांना पुढे केलं होतं. त्यामुळे जनतेत या दोन नावांची चर्चा सुरु आहे. पण, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळे यांना डावललं जाईल का, असा प्रश्न उभा टाकला आहे.
राजस्थानमध्ये बुधवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर काँग्रेसने वेणूगोपाल यांना निरीक्षक म्हणून येथे पाठवले असून त्यांच्यावर येथील तिढा सोडविण्याची जबाबादारी आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे आपल्या काँग्रेससह सोबत येणाऱ्या एकूण 121 उमेदवारांची यादी दिली आहे. मात्र, येथेही ज्योतिर्रादित्य सिंधिया अन् कमलनाथ यांच्या समर्थकांची रस्त्यावरच घोषणाबाजी सुरू आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी कमलनाथ यांची भेट घेतल्याने कमलनाथ यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, ज्योतिर्रादित्य सिंधिया हे राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत.
छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर सत्ता काबिज करण्यास काँग्रेसला यश आले आहे. मात्र, येथेही मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. कद्दावर नेता सिंहदेव आणि प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल या दोन नावांमध्ये ही रस्सीखेच सुरू आहे. मात्र, बघेल हे या ना त्या कारणामुळे नेहमी वादग्रस्त राहिले आहेत. सेक्स सीडीप्रकरणानंतर बघेल हे अचानक चर्चेत आले होते. दरम्यान, राहुल गांधींनी एका व्हिडीओ रेकॉर्डेड मेसेज कार्यककर्त्यांपर्यंत पोहोचवला असून कार्यकर्त्यांची पसंदी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याबाबत आपले मत कळविण्याचेही आव्हान राहुल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.