नवी दिल्ली :
मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या मदतनिसांसाठी काही आसने राखीव ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठ व्यक्ती आणि एकट्या अथवा मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राखीव आसनांची सोय आधीपासूनच रेल्वेत आहे.
रेल्वे बोर्डाने ३१ मार्च रोजी एक आदेश आपल्या विभागीय कार्यालयांसाठी जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, स्लीपर क्लासच्या रेल्वेत चार बर्थ दिव्यांग व त्यांच्या मदतनिसांसाठी राखीव असतील. त्यातील दोन बर्थ ३ एसी (एक खालचा आणि एक मधला) आणि दोन बर्थ ३ ई क्लासचे (एक खालचा आणि एक मधला) असतील. याशिवाय एसी चेअर कार ट्रेनमधील दोन आसने दिव्यांगांसाठी आरक्षित असतील.
सवलत कुणाला?चार प्रवर्गांतील दिव्यांगांना रेल्वेत सवलतीच्या दरात प्रवासाची सोय आहे. हाडाचे अपंगत्व, कंबरेच्या खालच्या भागाला पक्षाघात झालेल्या व्यक्ती, मदतनिसांशिवाय प्रवास करू न शकणारे मनोरुग्ण आणि पूर्ण अंध आणि पूर्ण मूकबधिर व्यक्ती यांचा त्यात समावेश आहे.