नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक सारखीच कारवाई केली आहे. भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमक्या किती दहशतवाद्यांचा मृत्यू झाला याची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. लष्कराने सर्जिकल स्ट्राइक या शब्दाचा वापर केलेला नाही पण भारत-म्यानमार सीमेवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार, भारत-म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. इंडो-म्यानमार सीमेजवळील लांग्खू गावाजवळ सकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही अशी माहिती लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिली आहे. या कारवाईमध्ये नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग)या प्रतिबंधित संघटनेचे अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती आहे. या दहशतवादी संघटनेचे अनेक कॅम्प उद्ध्वस्त झाले आहे.
भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाई केलेली नाही असं ईस्टर्न कमांडने स्पष्ट केलं आहे.
(फाईल फोटो सौजन्य - Reuters )