मुंबई - येस बँकेतील व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्थगिती आणली आहे. ग्राहकांना त्यांच्या येस बँकेतील खात्यातून येत्या ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या बँकेशी व्यवहार करणाऱ्या हजारो खातेदारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांना बँकांचा फटका सातत्याने बसत असल्याने, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
येस बँकेचे ग्राहक असलेल्या नागरिकांना 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढता येऊ शकत नाही. बँकेच्या निर्बंधामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. येस बँकेच्या डबघाईनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन सर्वसामान्य नागरिकांचं दु:ख मांडताना, बँकांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते. उत्तर प्रदेशमधील या शेतकऱ्याने बँकेसमोरच आपली जीवनयात्रा संपवली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे, लहान व कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही बँकेकडून त्रास दिला जातोय, असे प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. तसेच, भाजपा सरकारकडून खोट्या कर्जमाफीचा ढोल वाजविण्यात येत आहे. आता, या कुटुंबासाठी भाजपाकडे काय उत्तर आहे? असा प्रश्नही प्रियंका गांधींनी विचारला आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर देशातील बँकांच्या परिस्थितीवर प्रियंका यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे धनदांडगे लोकं, उद्योजक बँकांना लुबाडत आहेत. तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना बँकांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय, हेच प्रियंका यांनी सूचवलंय.
दरम्यान, येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे ३० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास कपूर यांना अटक करण्यात आली आहे.