हैदराबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने हैदराबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आरएएसएसच्या अधिकृता ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये यावेळी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे. पुढील महिन्यात आरएसएसशी संलग्नित संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यासंदर्भात हे ट्विट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या समन्वयक बैठकीची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर करण्यात आला असून कंसात हैदराबाद असे लिहिण्यात आले आहे. पुढील महिन्यात 5 ते 7 जानेवारी 2022 तेलंगणातील हैदराबाद येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी दिल्लीच्या औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. अब्दुल कलाम मार्ग असे ठेवण्यात आले आहे. व्हीएचपीचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी म्हटले की, विशेष ठिकाणांना त्यांच्या जुन्या नावानेच ओळखले जावे किंवा देशातील आदर्श व्यक्तींचे नाव त्या स्थळाला असावे, असेही अलोक कुमार यांनी म्हटले. त्यामुळेच, आम्ही हैदराबादला भाग्यनगर असे संबोधत असून हैदराबादचे नाव भाग्यनगर व्हावे, ही आमची इच्छा आहे.