ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - संसदेवरील हल्ल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर फासावर लटकवण्यात आलेल्या अफजल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक केली.
भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा मुद्दा लावून धरला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी दिल्लीतील इंडिया गेट येथेही निदर्शन केली. पोलिसांनी तेथून आंदोलकांना ताब्यात घेतले.
देशद्रोह आणि गुन्ह्याचा कट रचणे या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी कन्हय्या कुमारला अटक केली आहे. साध्यावेशातील दोन पोलिस जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आले. त्यांनी तेथून कन्हय्या कुमारला आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले नंतर त्याला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संसदेवर हल्ला केल्याबद्दल फाशी देण्यात आलेला अफजल गुरू याच्या फाशीच्या निर्णयाचा निषेध करत अफजल गुरूच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करून देशविरोधी घोषणा देणा-या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कार्यक्रमाविरोधात भाजप खासदार महेश गिरी यांनी वसंत कुंज पोलिस स्थानकात तक्रार दाखल इंडियन पीनल कोडअंतर्गत कलम १२४ अ (देशद्रोह) आणि १२० ब लावून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली होती, भारतीय विद्यार्थी परिषद आणि अन्य संघटनांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. मात्र असं असतानाही विद्यार्थ्यांनी त्यांना न जुमानता मंगळवारी हा कार्यक्रम घेतला.
अफजल गुरूला फाशी दिल्याच्या निर्णयावर नाराजी दर्शवत सरकार व देशाविरोधात घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले, या प्रश्नावरून सुरू झालेले आंदोलन गुरुवारीही सुरूच होते. अखेर या विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रविरोधी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत - राजनाथ सिंह
दरम्यान जेेएनयूच्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांवर कडक योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. देशविरोधी घोषणा देत देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणा-यांनी कधीच माफ केले जाणार नाही असे सांगत सरकार कोणत्याही देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकाराबाबत नाराजी दर्शवली असून देशाचा कोणताही नागरिक भारतमातेचा अपमान सहन करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.