ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - अफझल गुरूला फाशी देण्याचा आदेश काढताना सत्तेत असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं की प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अफझलचा 2001 मधल्या संसदेवरील हल्ल्यामधल्या सहभागाविषयी खरोखर संशय होता, त्याचा सहभाग नि:संदिग्ध होता असं म्हणता येणार नाही.
ईकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार चिदंबरम यांनी ईटीच्या पत्रकाराशी बोलताना वरील मत व्यक्त केलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वाद विवाद झडतील अशी चिन्हे आहेत. अफझलची केस कदाचित योग्यपणे ठरवण्यात आली नाही अशी प्रांजळ कबुली चिदंबरम यांनी दिली आहे.
अफझलच्या खटल्यामध्ये कोर्ट योग्य निष्कर्षाला पोचलं होतं का आणि फाशी ही योग्य शिक्षा होती का असा प्रश्न चिदंबरम यांना विचारण्यात आला होता. यावेळी चिदंबरम म्हणाले की, "मला वाटतं कीअफझल गुरूच्या बाबतीत योग्य निर्णय झाला नाही असं प्रामाणिक मत बनवणं शक्य आहे. पण, सरकारमध्ये असताना असं म्हणता येत नाही, कारण सरकार म्हणून तुम्हीच त्याच्यावर खटला भरलेला असतो. पण एक तटस्थ व्यक्ती या नात्याने या खटल्याचा निकाल योग्य नव्हता असं मत बाळगता येतं."
चिदंबरम 2008 ते 2012 या कालावधीत केंद्रीय गृहमंत्री होते, त्यानंतर त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं व अर्थखात्याचा भार त्यांना देण्यात आला. अफझल गुरू 2001 मध्ये झालेल्या संसदेवरील हल्ल्यात 2013 मध्ये दोषी आढळला, ज्यावेळी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते.
अफझलचा या हल्ल्यामधला सहभाग किती होता याबद्दल संदिग्धता असल्यामुळे त्याला आजीवन कारावासात ठेवणं योग्य झालं असतं असं मत चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे.
अफझलच्या फाशीवरून जेएनयूमध्ये रणकंदन झालेलं असताना आणि एकूणच देशामध्ये प्रचंड कटुतेचं वातावरण निर्माण झालेलं असताना, चिदंबरम यांची ही स्पष्टोक्ती कदाचित राजकीय वादविवादांना आमंत्रण देऊ शकते.