लोकसभा निवडणुकीत खलिस्तानी दहशतवाद्यांनी निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काश्मीरमध्ये भारताविरोधात हिंसाचार करणारे, पसरविणाऱ्यांचाही यात समावेश आहे. २०१६ मध्ये दक्षिण काश्मीर आणि कुलगाममध्ये हिंसाचाराच्या आंदोलनांचे आयोजन करणाऱ्या सरजन बरकती उर्फ आझादी चाचा यानेही उमेदवारी दिली आहे. बरकती सध्या तुरुंगात असून तुरुंगातून त्याने अर्ज दाखल केला आहे.
एवढेच नाही तर अफझल गुरुचा भाऊ एजाज यानेही जम्मू काश्मीर निवडणुकीत लढण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. संसदेवर दहशतवादी हल्ला केल्या प्रकरणात अफझल गुरुला फासावर लटकविण्यात आले होते. त्याचा भाऊ एजाज गुरुने सोपोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
370 कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती बदलू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जमात ए इस्लामीचे अनेक नेते मतदानासाठी आल्याचे दिसले होते. या राज्यात १० वर्षांनी निवडणूक होत आहे. भाजपा या राज्यात एकट्याने लढणार आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने दोन तर भाजपाने तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
जमात-ए-इस्लामीने १९८७ पर्यंत सर्व विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. 1972 मध्ये २२ पैकी ५ उमेदवार जिंकले होते. तर 1977 मध्ये १९ पैकी १ उमेदवार जिंकला होता. 1983 मध्ये २६ पैकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला होता.