ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावणारे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस एन ढिंगरा यांनी अफजल गुरुचं समर्थन करणा-यांना फटकारल आहे. अफजल गुरुला समर्थन करणारे राजकारणीदेखील त्याच्या हल्यात मारले गेले असते हे त्यांनी लक्षात ठेवाव असं ढिंगरा बोलले आहेत.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ढिंगरा यांनी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेणा-या जेएनयूमधील विद्यार्थ्यांची बाजू घेणा-यांवर आक्षेप नोंदवला आहे. जे राजकारणी अफजल गुरुचं समर्थन करत आहेत त्यांच्यापैकी अजून 40-50 जण हल्यात मारले गेले असते तर आज दृष्य वेगळं असतं. फक्त 15 जणांचा मृत्यू झाला म्हणून आपण त्याला शहीद म्हणत आनंद साजरा करणार आहोत का ? अस सवालदेखील ढिंगरा यांनी विचारला आहे.
अफजल गुरुच्या फाशीला न्यायालयीन हत्या म्हणणा-यांवरदेखील ढिंगरा यांनी टीका केली आहे. समाजासाठी घातक असणा-याचा खात्मा करण्याचा अधिकार आपल्याला न्यायव्यवस्थेने दिला आहे. जर ही न्यायालयीन हत्या असेल तर मग कारागृहवासाची शिक्षा सुनावण्याला तुम्ही न्यायालयाने जीवनाचा केलेला विनाश म्हणणार का ? असा सवाल ढिंगरा यांनी केला आहे.