नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धावा घेण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. या बैठकीमध्ये सहा विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, विरोधी पक्षांची ही बैठक म्हणजे निवडणूक संपण्यापूर्वीच पारभव पत्करल्याचे उदाहरण असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.या बैठकीनंतर टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान चार हजारांहून अधिक इव्हीएम खराब झाल्या होत्या, असा आरोप नायडू यांनी केला. ''आम्ही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोता. जगाच्या पाठीवर ईव्हीएमचा वापर करणारे खूपच कमी देश आहेत. जर आम्हाला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर मतपत्रिकेव्दारे मतदान घेतले पाहिजे,'' असे नायडू यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत आहे, असे वाटत नाही.जर तुम्ही एक्स पार्टीला मत दिले तर मत वाय पार्टीला जात आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशीनमधून येणारी चिठ्ठीसुद्धा 7 सेकंदांऐवजी तीन सेकंदच दिसत आहे,असा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 7:20 PM