ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १० - दादरीमधली घटना ताजी असतानाच आग्र्यापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मैनपुरी येथे गाईची हत्या केल्याचा आरोप असलेल्या चौघांचा हिंसक जमावानं पाठलाग केल्याची आणि त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हिंसक जमावाने १२ दुकानांना आग लावली असून पोलीसांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये सात पोलीसांसह अनेक नागरीक जखमी झाले आहेत. पोलीसांनी अश्रुधुराचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर हे देखील उघड झाले की नैसर्गिकरीत्या मरण पावलेल्या गाईला तिच्या मालकानेच कातडं कमावण्यासाठी चौघांकडे सोपवले होते. परंतु गाईची हत्या हे शब्द नुसते ऐकल्यावर सुमारे ५०० जणांचा जमाव गोळा झाला आणि गाईची हत्या करणा-यांना ताबडतोब शिक्षेची मागणी करू लागला. पोलीसांनी यास नकार दिल्यावर जमावाने पोलीसांनाच मारहाण केली.
पोलीसांच्या तपासात गाईची हत्या झाली नसल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी ५०० अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच २० जणांना अटक करण्यात आली आहे. गाईच्या मालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, याप्रकरणावरून गाईच्या मुद्यावरून उत्तर भारत किती तापलेला आहे हे दिसत आहे.