- ऑनलाइन लोकमत
ओडिशा, दि. 26 - पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच अजून एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये मृतदेहाची अवहेलना करण्यात आली आहे. मृतदेह घेऊन जाणं सोप्पं पडावं यासाठी चक्क मृतदेहावर उभं राहून हाडं मोडण्यात आली, जेणेकरुन मृतदेहाची उंची कमी करुन नेणं सोप्पं व्हावं. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर दोन कामगारांनी हा मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून चक्क एखादं जनावर बांधून नेल्यासारखं नेला.
हा मृतदेह 76 वर्षीय सलमानी बरिक यांचा होता. ट्रेनखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सोरो शहरातील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये त्यांचा मृतदेह आणण्यात आला होता. पोस्टमार्टम करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने 30 किमी लांब असलेल्या जिल्हा रुग्णालयात मृतदेह घेऊन जावा लागणार होता. पण जिल्ह्यात रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने रेल्वे पोलिसांनी ट्रेनमधून मृतदेह घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
रिक्षाने जाणं महाग असल्याने पोलिसांनी सफाई कामगारांना मृतदेह स्टेशनपर्यंत घेऊन जाण्याची सोय करण्यास सांगितलं. तोपर्यंत मृतदेह कडक झाला होता. मृतदेह नेण्यास जास्त कष्ट पडू नयेत यासाठी कामगारांनी मृतदेहाचं कमरेचं हाड मोडलं, आणि त्यानंतर एखादी गादी दुमडावी तसा दुमडला आणि काठीला बांधून नेला. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन फक्त दोन किमी अंतरावर होतं.
'माझ्या आईच्या मृतदेहाची त्यांनी अवहेलना केली. मी काहीच करु शकत नाही, प्रशासनाने मला मदत करुन न्याय द्यावा', अशी मागणी मृत महिलेच्या मुलाने केली आहे. ओडिशा मानवाधिकार आयोगाने रेल्वे पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. ओडिशामध्येच वाहन नाकारलं म्हणून दाना माझी या आदिवसी व्यक्तीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमी प्रवास केला असताना आता पुन्हा या घटनेमुळे नेमकं प्रशासन करतय तरी काय असा सवाल विचारला जात आहे.