ऑनलाइन लोकमत
कोयंबतूर, दि. २० - इराक आणि सीरियात क्रूरकृत्यांमुळे चर्चेत असलेली इसिसविरोधात आता देशभरातील ४० हिंदूत्ववादी संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी इंडिया अगेंस्ट इस्लामिक स्टेट ही मोहीमच सुरु केली असून या मोहीमेसाठी नवीन वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियात हैदोस घातला असून या दहशतवादी संघटनेकडे मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मिडीयाचाही प्रभावी पद्धतीने वापर होत आहे. भारतातील काही मुस्लिम तरुणही या संघटनेत सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील ४० हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन 'इंडिया अगेंस्ट इस्लामिक स्टेट' ही मोहीम सुरु केली. ही मोहीम मुस्लिमांविरोधात नव्हे तर दहशतवादी संघटनेविरोधात आहे. दहशतवादाविरोधात जनजागृती करण्यासाठी ही मोहीम सुरु केल्याचे मोहीमेचे सदस्य आणि श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी सांगितेल. सोमवारी कोइंबतूरमध्ये हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या हस्ते indiaagainstislamicstate.com' या वेबसाईटचा शुभारंभही करण्यात आला. मुस्लिमांनीही या मोहीमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.