ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - जगभरात धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिस इस्लामच्या तत्वां विरोधात जाऊन काम करणारी संघटना आहे. काश्मीरमध्ये जे तरुण आज इसिसचा झेंडा हातात घेत आहेत त्यांना त्याचा अर्थही माहित नाही या शब्दात जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पक्ष पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी इसिसवर टीका केली.
काश्मीरच्या विषयावर बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. कोणतही प्रसारमाध्यम जम्मू-काश्मीरमध्ये साजरा होणारा १५ ऑगस्टचा कार्यक्रम दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी काश्मीरींकडे संशयाने पाहिले जाते. आपल्याला काश्मीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
सहिष्णूता आपल्या देशाची शक्ती आहे. पण काही चूकीची माणस हिंदुत्वाचा गैरवापर करत आहेत असे त्या म्हणाल्या. बिहारच्या निकालांनी भारताच्या राजकारणासाठी फार महत्वाची कामगिरी केली असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली.