नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी यांनी आज सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. असे करणारे नरेंद्र मोदी बिगर काँग्रेसी पहिलेच पंतप्रधान बनले आहेत. यावेळी मोदी यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्यावरही मोठे संकेत दिले आहेत.
कोरोनावरील औषध कधी येणार, देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार आदी बाबींवर मोदी यांनी भाष्य केले. याचबरोबर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा केली. यावेळी मोदी यांनी नारीशक्तीला सलाम करत मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत सरकार विचार करत असून समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
देशात जी 40 कोटी जनधन खाती सुरु झाली आहेत त्यापैकी 22 कोटी खाती ही महिलांची आहेत. कोरोना काळात महिलांच्या खात्यांवर एप्रिल, मे, जूनमध्ये जवळपास 30 हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. आज महिला कोळसा खाणींसह लढाऊ विमानांद्वारे यश मिळवत आहेत. भारतीय महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले आहे. नोकरदार गर्भवती महिलांसाठी भरपगारी 6 महिन्यांची सुटी देण्यात आली आहे. तिहेरी तलाकमुळे महिला त्रस्त होत्या, त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गरीब मुलींच्या आरोग्याची चिंताही सरकारला आहे, असे मोदी म्हणाले.
लालकिल्ल्यावरून मोदींनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली. या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार असून त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडलाय. तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे. शेतकरी बंधनमुक्त झाला. देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. कामगारांसाठी शहरांमध्ये राहण्याची योजना राबविणार. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल, विविध क्षेत्रात 7 हजार प्रकल्पांची निवड केली आहे. चार लेनचे हायवे बनविण्यासाठी काम करणार आहोत. परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली असे मोदी यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा