जम्मू : मोदी सरकारमधील संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या दौऱ्याच्या एक दिवसआधी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर पुँछ भागात गोळीबार केला आणि मोर्टार डागले. भारताने या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संरक्षण मंत्र्याच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी नियंत्रण रेषेवर पाकने केलेला गोळीबार हा योगायोग असू शकत नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने ८१ एमएम मोर्टार शेल्स डागले. तसेच स्वयंचलित आणि अन्य शस्त्रांनी आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण रेषेवर पुँछ जिल्ह्णातील मेंढर-भीम्बर गली-केरी भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात जीवितहानी किंवा अन्य कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सीमेची सुरक्षा करीत असलेल्या भारतीय जवानांनी पाकच्या गोळीबाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. ओमर अब्दुल्ला यांनी राजौरी आणि पुँछ भागात झालेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. यावेळी काही बॉम्ब गोळे नागरी वस्त्यांमध्ये पडले. पशुधनाचे नुकसान झाले, असेही अब्दुल्ला यांनी टिष्ट्वट केले. (वृत्तसंस्था)
संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच आगळीक
By admin | Published: June 14, 2014 3:17 AM