सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. दरम्यान, आज खासदार जया बच्चन यांनी सभापतींनी केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधक आणि सभापती पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. तसेच सभापतींनी माफी मागावी, अशी मागणी जया बच्चन आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याबरोबरचा सभापतींविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारीही राज्यसभेतील विरोधी पक्षांनी केली असून, त्यासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात महाभिगोय प्रस्तावावर सदस्यांच्या सह्या घेतल्या जात आहेत.
जगदीप धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं वृत्त एबीपी न्यूजसह काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी १४ दिवसांची नोटिस द्यावी लागते. त्यादृष्टीने विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महाभियोग प्रस्ताव दोन तृतियांश बहुमताने पारित झाला, तर सभापतींना पद सोडावं लागू शकतं. मात्र सध्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी एनडीएकडे बहुमत नसलं तरी बहुमताच्या जवळपास जाणारं संख्याबळ आहे. तसेच राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांमध्ये नसलेलेही अनेक पक्ष आणि खासदार आहेत. त्यामुळे आता या अविश्वास प्रस्तावाबाबत विरोधक पुढे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
दरम्यान, आजच्या राज्यसभेच्या कामकाजादरम्यान जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, "मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला इतरांची देहबोली (बॉडी लँग्वेज) आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. पण मला माफ करा सर, पण तुमचा बोलण्याचा टोन हा स्वीकारार्ह नाही. आपण सहकारी आहोत," असे जया बच्चन म्हणाल्या.
त्यानंतर सभापती जगदीप घनखड म्हणाले की, "जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय... आता बास झालं... तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही."