नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहर लाल नेहरु विद्यापीठ(जेएनयू) मधील विद्यार्थ्यांकडून फी वाढ केल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थी व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे देखील दिसून येत आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून हे विद्यार्थी जेएनयू कॅम्पसमध्ये आंदोलन करत होते. मात्र आज विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांनी त्यांनी भेटून समस्या मांडायच्या होत्या. मात्र पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रोखण्यात आल्याने धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला.
हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थींनी आंदोलन सुरु केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत आहे.