ऑनलाइन लोकमत
दार्जिलिंग, दि.17- गोरखा जनमुक्ती मोर्चाचे दार्जिलिंगमध्ये चाललेल्या आंदोलनाने आज नवे हिंसक वळण घेतले आहे. शनिवारी झालेल्या आंदोलनामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला भोसकल्याची घटना घडली असून आंदोलकांनी एक पोलीस व्हॅनही जाळली आहे. गोरखालॅंडच्या मागणीसाठी सुरु असणारे हे आंदोलन गेले काही दिवस अधिकाधिक चिघळत चालले आहे.
गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड, पेट्रोल बॉम्ब तसेच बाटल्या फेकल्यामुळे पोलिसांना लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना आवरावे लागले. इंडिया रिझर्व्ह बटालियनचे असिस्टंट कमांडंट किरण तमांग यांना आंदोलकांनी भोसकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत, या तणावपूर्व परिस्थितीमुळे दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गोरखा जनमुक्तीच्या माध्यम विभागाचे प्रमुख आणि जीजेएमचे वकील अमर राय यांचा मुलगा विक्रम याला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमर राय यांनी आपल्या मुलाचे कोणतेही राजकीय संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे गोरखा जनमुक्तीचे बिनय तमांग यांनी आपल्या घरात पोलीस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी छापा टाकून नासधूस केल्याचा आरोप केला आहे.
या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनामागे मोठ्या कटाचा संशय़ व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे बंडखोरांचे गट गोरखा जनमुक्ती मोर्चाला मदत करत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे. गोरखा टेरिटोरियल अॅडमिनिस्ट्रेशनच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळेच हीच अस्थिरता पसरवण्यात येत असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, "पाच वर्षे तुम्ही (गोरखा जनमुक्ती मोर्चा) सत्ता उपभोगलीत, आता निवडणुका आल्यावर तुम्ही हिंसा पसरवत आहात, कारण तुम्ही तुमची पत गमावलेली आहे. ही आंदोलनातील हत्यारे काही एका दिवसात गोळा केलेली नाहीत, ती गेल्या काही काळात जमवलेली आहेत." गोरखा जनमुक्तीशी चर्चा करायला आम्ही नेहमीच तयार आहोत पण कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेच्या उल्लंघनाला पाठिंबा दिला जाणार नाही असेही बॅनर्जी यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केले.
हे आंदोलन सुरु झाल्यावर गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी पर्यटकांनी लवकरात लवकर दार्जिलिंग सोडावे असा सल्ला दिला होता आणि आंदोलनाच्या काळात पर्यटकांनी दार्जिलिंगमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर राहावे असा इशारा दिला होता. या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील सामान्य जनजीवन, पर्यटन, बॅंका आणि सरकारी कार्यालये ठप्प झाली आहे.