जयपूर : राजस्थानच्या उदयपूरच्या खेरवाडा शहरात झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. डुंगरपूर आणि उदयपूर जिल्ह्यांत आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी सरकारी आणि खासगी संपत्तीचे नुकसान केले. वाहनांना आग लावली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी रबराच्या गोळ्यांचा मारा केला. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे रॅपिड अॅक्शन फोर्सची (आरएएफ) मदत मागितली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पोलीस महासंचालक एम. एल. लाठर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना डुंगरपूरला पाठविले आहे. तत्पूर्वी, राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्याशी फोनवर चर्चा केली.
आंदोलन कशासाठी?
शिक्षक पात्रता परीक्षेशी (रीट) संबंधित आपल्या मागण्यांसाठी हे तरुण आंदोलन करीत आहेत. आंदोलकांनी गुरुवारी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावली. दोन बाईक जाळल्या. दोन दिवसांत २० हून अधिक वाहनांना आग लावण्यात आली आहे. पेट्रोलपंप आणि हॉटेलमध्ये लुटमार झाली.