भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष (WFI) ब्रिजभूषण शरण सिंह आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये समन्वय झाल्याचे दिसते. केद्रींय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलक कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती दिली. तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला.
यानंतर अनुराग ठाकूर म्हणाले की, संवेदनशील विषयावर कुस्तीपटूंशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, या बैठकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण करून दिल्ली पोलिसांना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल. म्हणजेच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नवा व्यक्ती विराजमान होईल. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत आयोगाच्या समितीकडून दोन जणांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महिला कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा मिळेल याची आम्ही काळजी घेऊ, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
पैलवानांनी काय म्हटले? वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कुस्तीपटू साक्षी मलिकने बैठकीनंतर सांगितले की, दिल्ली पोलीस २८ मे रोजी खेळाडूंवर दाखल करण्यात आलेला एफआयआर मागे घेतील. "आमचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित करावे असे सांगण्यात आले आहे", असे साक्षी मलिकने सांगितले. दुसरीकडे बजरंग पुनियाने म्हटले की, आम्ही आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित केले आहे, पण हे आंदोलन अजून संपलेले नाही.
२३ एप्रिलपासून आंदोलनावर... भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी देशातील नामांकित पैलवान २३ एप्रिलपासून आंदोलन करत आहेत. जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले आहे.