नवी दिल्ली - आजपासून दिल्लीमध्ये अण्णा हजारे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच अण्णा हजारेंनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
सरकार आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या बस, रेल्वे सरकारने रोखल्या आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असे होता कामा नये असेही ते म्हणाले आहेत. आज माध्यमांशी बोलताना अण्णा हजारें यांनी सरकारवर हा आरोप केला आहे.
आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा राजघाटाकडे कूच केली आहे. राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. अण्णा हजारे रामलीला मैदानावर धरणं आंदोलन करणार असून, अण्णांच्या या आंदोलनाला काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोपही अण्णा हजारे यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशी विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.