नवी दिल्ली : केंद्र सरकारनेअग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर देशातील अनेक राज्यात तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या योजनेला विरोध केला आहे. त्यानंतर, आता काँग्रेसचे बिहारमधील काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारनेही या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर निशाणा साधला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि या योजनेवर भाष्य केलं. ही योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तरुणांशी संवाद साधला का, विरोधी पक्षांशी चर्चा केली का, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे.
केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असे कन्हैय्याने म्हटले. तसेच, सैन्यदलात गृहमंत्र्यांचं पोरगं जात नाही, त्यांचं पोरगं बीसीसीआयचा सचिव बनतं. तेथे सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी, कामगार वर्गातील मुलं भरती होत असतात. माझ्या कुटुंबातील, नातेवाईकांमधील 16 जण सैन्यात देशसेवा करत आहेत. त्यामुळे, मी अनुभवातून सांगतो की ही योजना तरुणाईच्या हिताची नाही, असे कन्हैय्या कुमारने स्पष्ट केले.
युवकांना सरकारने 4 वर्षाचे लॉलिपॉप दाखवले आहे. पण, बिहारमधील बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. सैन्यात भरती नसेल तर येथील युवकांचे लग्न होत नाहीत. या योजनेनुसार एखादा तरुण 4 वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त होऊन 21 व्या वर्षी घरी येईल, तेव्हा लग्नासाठी त्याला मुलगी कोण देईल, त्याच्याशी लग्न कोण करेल?, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे. तसेच, काँग्रेसचा या योजनेला संपूर्णपणे विरोध असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे, सरकारने तात्काळ ही योजना मागे घ्यावी आणि नियमित भरती प्रक्रियेतूनच सैन्य भरती करावी, अशी मागणीही सरकारकडे केली आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन होत आहे. यात सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे. त्याबाबतही कन्हैय्याने आंदोलकांना महत्नाचा सल्ला दिला. “तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं”, असं आवाहनही कन्हैय्याने केलं आहे.
काँग्रेस पक्ष तरुणांसोबत : सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या देशभरातील तरुणांना समर्थन देतानाच शांततेचे आवाहन केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात असलेल्या सोनिया गांधी यांनी आंदोलकांना उद्देशून एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारने पूर्णत: दिशाहीन असलेली योजना जाहीर केली आहे. पूर्णत: शांततेत आणि अहिंसक मार्गांनी आंदोलन करा. काॅंग्रेस तुमच्या साेबत आहे.
पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण
आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाक
आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.