Agneepath Scheme: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत बिहारसह अनेक राज्यांत विरोध सुरू आहे. या योजनेला विरोध करत तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसनेही मोदी सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. आता ओवेसी यांनी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधलाय. या ट्विटमध्ये त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता पोस्ट केली आहे.
ओवेसी यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या शब्दांत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी हरियाणातील पलवलचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस हवेत गोळीबार करताना दिसत आहेत.
पीएम मोदींना टॅग करत ओवेसी यांनी लिहिले की, "तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, #अग्निपथ अग्निपथ अग्निपथ -हरिवंशराय बच्चन" नरेंद्र मोदीजी, यांना कपड्यावरुन ओळखू नका, गोळी आणि बुलडोझर चालवू नका. तुमचा चुकीचा निर्णय परत घ्या. देशातील 66% लोकसंख्या तरुण आहे. मुद्दा समजून घ्या."
आणखी एका ट्विटमध्ये ओवेसींनी लिहिले की, "अग्निपथ योजनेमुळे बेरोजगारी कमी होणार नाही तर ती वाढेल. पाकिस्तानसोबतचा दहशतवादाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आणि दुसरीकडे चीनने आपल्या भूमीवर कब्जा केला आहे. आपली सेना ही तुमच्या 'योजना' आणि 'ब्रेन वेव्ह'ची प्रयोगशाळा नाही. ही योजना देशाच्या हिताची नाही," असे ओवेसी म्हणाले.