मोदी सरकारने पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. यानुसार तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. सैन्यात चार वर्षे नोकरी केल्यानंतर या तरुणांना सेवा निधी देखील दिला जाणार आहे.
तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. चार वर्षांच्या सैन्य सेवेनंतर तरुणांना भविष्यासाठी अधिक संधी दिली जाणार आहे. सेवा निधी पॅकेज चार वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण 10 आठवडे ते 6 महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी 10/12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीरांच्या ५० हजार जागा भरण्यात येणार आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात आलेल्या तरुणांना पहिल्या वर्षी 4.76 लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षी हे पॅकेज 6.92 लाखांवर जाईल. याशिवाय अन्य रिस्क आणि हार्डशिप भत्ते देखील दिले जातील. चार वर्षांनंतर सैन्य दल सोडावे लागणाऱ्या अग्निवीरांना 11.7 लाख रुपए सेवा निधी दिला जाईल, यावर कोणताही कर लावला जाणार नाही.
जे अग्निवीर कुशल आणि सक्षम असतील त्यांना पुढे सैन्यात नोकरीवर ठेवले जाणार आहे. परंतू हा आकडा २५ टक्केच असेल. या प्रकल्पामुळे लष्कराचीही कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते. कमी लोकांना पेन्शन द्यावी लागेल, तर दुसरीकडे पगारातही बचत होईल.