नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे.
बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. यात बिहार व तेलंगणध्ये प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला डाव्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीनं या बंदला समर्थन दिलं आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अफवा रोखण्यासाठी बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेविरोधात निदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत.
२०० रेल्वे रद्द-
आंदोलक रस्त्यावर उतरल्याने देशाच्या अनेक भागांत २०० रेल्वे रद्द केल्या. पूर्व मध्य रेल्वेच्या १६४, उत्तर पूर्व रेल्वेच्या ३४, उत्तर रेल्वेच्या १३ व पूर्वोत्तरच्या ३ रेल्वे रद्द केल्या आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य रेल्वेने ६४ रेल्वेंना मध्येच थांबविले आहे. बिहारमध्ये १२ जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. सैन्य भरतीच्या नव्या प्रक्रियेविरुद्ध रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी १८ जून रोजी बिहार बंदची हाक दिली आहे.
तेलंगणात गोळीबारात एक ठार-
तेलंगणात सिकंदराबाद स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर आणि रेल्वेला आग लावल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सिकंदराबादमध्ये ३०० ते ३५० लोकांच्या जमावाने एका रेल्वेच्या पार्सल कोचमध्ये आग लावली. या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला.
तरुणांना फायदा हाेईल- केंद्रीय गृहमंत्री
अग्निपथ योजनेत सहभागी होण्याची कमाल वयोमर्यादा वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने तरुणांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना साथीच्या काळात गत दोन वर्षात सैन्यात भरती प्रक्रियेत अडथळे आले. नरेंद्र मोदी यांनी तरुणांची काळजी करत एक संवेदनशील निर्णय घेतला आहे.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री