नवी दिल्ली - देशात केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेवरून बरेच वादंग निर्माण झाले आहेत. या योजनेच्या निषेधार्थ देशातील अनेक राज्यांत हिंसक आंदोलन पेटले. रेल्वे जाळल्या, बसेसची तोडफोड झाली. जवळपास २०० कोटींच्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झाल्याचं समोर आलं. या सर्व वादावर अखेर बंगळुरू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने मागील ८ वर्षात स्पेस आणि डिफेन्स क्षेत्राची दारे युवकांसाठी उघडली आहेत. रिफॉर्मचा मार्गच आपल्याला नवीन लक्ष्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अनेक वर्षापासून या क्षेत्रात एकाधिकारशाही होती. ड्रोनपासून इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही युवकांना संधी दिली. सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवले. त्याठिकाणी युवकांनी आयडिया दिल्या. सुरुवात जरी खराब दिसत असली तरी आगामी काळात त्याचे खूप फायदे होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
त्याचसोबत खासगी असो वा सरकारी उपक्रम दोन्हीही देशासाठी ऐसेट आहे. त्यासाठी लेवल प्लेयिंग फिल्ड सर्वांना समान मिळायला हवी. मागील ८ वर्षात १०० हून अधिक बिलियन डॉलर कंपन्या उभ्या राहिल्या. ज्यात दरमहिन्याला नवीन कंपन्या जोडल्या गेल्या. स्टार्टअपच्या जगात भारत वेगाने प्रगती करत आहे. आतापर्यंत हजारो कोटी व्यवसाय झाला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी जवळपास २७ हजार कोटींच्या विविध योजनांना कर्नाटकात हिरवा कंदील दाखवला. बंगळुरू येथे उपनगरीय रेल्वे योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. दुसरीकडे बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचं उद्धाटन झाले. बंगळुरूला वाहतूक कोडींतून मुक्त करण्यासाठी रेल्वे, रोड, मेट्रो, अंडरपास, फ्लायओव्हर प्रत्येक योजनेत सरकार काम करत आहे. बंगळुरूच्या उपनगरीय भागाला जोडण्यासाठी सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध आहे असं मोदींनी सांगितले.