नवी दिल्ली: सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा २३ वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा २१ वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे.
लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने १४ जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात ४ वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी आमदार गाडीत उपस्थित होत्या.
तरुण काय म्हणतात...?
मुजफ्फरपूरमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांनी सैन्य भरती बोर्डाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. सरकारची योजना ही योग्य नाही. चार वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. चार वर्षांत आमचे काय होणार आहे. पेन्शनची सुविधाही नाही, असे या तरुणांनी स्पष्ट केले.
माजी लष्करप्रमुख काय म्हणतात...?
अग्निपथ योजनेमुळे लष्कराची रचना बिघडणार का? माध्यमांच्या या प्रश्नावर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह म्हणाले की, कोणतीही नवीन गोष्ट जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत त्याबद्दल अधिक माहिती नसते. ज्या टीमने ही योजना बनवली, त्या टीमचा मी भाग नाही. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. योजना नुकतीच जाहीर झाली आहे. पुढे काय होते ते पाहू.