काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे कौतुक केले आहे. हे एक योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, आजच्या काळात आपल्याला एका मोबाईल आर्मीची आणि एका युथ आर्मीची आवश्यकता आहे. आपल्याला तंत्रज्ञान आणि शस्त्रांवर अधिक खर्च करावा लागेल आणि जोवर आपले सैन्य मोठे होत नाही, तोवर हे होणार नाही. यासाठीच सर्वाधिक पैसा खर्च होतो.
मोदी सरकारच्या या योजनेला देशातील अनेक भागांतून विरोध होत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस पक्षानेही सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. ही सुरक्षा दलांशी तडजोड असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका मांडत, गेल्या दशकांमध्ये युद्धाच्या स्वरूपातील बदल ही एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.
तिवारी म्हणाले, "जर आपण सुरक्षा दलांकडे तीन दशके मागे जाऊन बघितले, तर आपल्याला मोबाईल अभियान दलाची आवश्यकता आहे, जे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत आणि तरुण देखील आहेत. यामुळे, त्या स्थितीत ही एक अत्यंत आवश्यक सुधारणा आहे.'' याच बरोबर, आपल्या आवडो वा न आवडो, पण वन रँक वन पेन्शन योजनेमुळे वाढणारे पेन्शन बिल, सरकारच्या हिशोबात गेलेच असेल, असेही तिवारी म्हणाले.
या योजनेमुळे देशभरातील तरुणांमध्ये नाराजी दिसून येत आहे, हे मान्य करत तिवारी म्हणाले, केंद्रीय सुरक्षा दल म्हणजे काही रोजगार हमी कार्यक्रम नाही. मात्र, तरीही सरकारने वर्तमान परिस्थितीनुसार, नियोजन करायला हवे. जेणेकरून अग्निवीरांची चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलांत रोजगाराच्या संधी मिळू शकतील.