बालासोर (ओडिशा) : भारताने गुरुवारी ओडिशाच्या लष्करी तळावर अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-३ या स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या व्हिलर बेटावर सकाळी ९ वाजून ५५ मिनिटाला जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र डागले गेले. काहीच क्षणात त्याने अचूक लक्ष्यभेद केला. स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र ३००० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. ही नेहमीची उपयोजित चाचणी असल्याचे, आयटीआर संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी सांगितले. ही चाचणी अग्नि-३ शृंखलेची तिसरी चाचणी असल्याचे संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्य अधिकाऱ्याने सांगितले.१७ मीटर लांब या क्षेपणास्त्राचा व्यास दोन मीटर आहे. प्रक्षेपणावेळी याचे वजन सुमारे ५० टन आहे. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत १.५ टन अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. लष्करात आधीच समाविष्ट करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रवर अत्याधुनिक हायब्रिड दिशादर्शक, मार्गदर्शक व नियंत्रण प्रणाली लागलेल्या आहेत. अग्नि-३ चे पहिले विकासात्मक परीक्षण ९ जुलै २००६ रोजी करण्यात आले होते. मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. यानंतर १२ एप्रिल २००७, ७ मे २००८ आणि ७ फेबु्रवारी २०१० रोजी याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. २१ सप्टेंबर २०१२ रोजी अग्नि-३ ची पहिली उपयोजित चाचणी पार पडली. यानंतर २३ डिसेंबर २०१३ रोजी दुसरी चाचणीही यशस्वी राहिली.
अग्नि-३ ची यशस्वी चाचणी
By admin | Published: April 16, 2015 11:54 PM