बालेश्वर : पाच हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता असणाऱ्या अग्नि ५ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातील अब्दुल कलाम आयलँड येथून घेण्यात आलेल्या या चाचणीने देशाच्या सैन्यबळाची ताकद वाढली आहे. संपूर्ण चीनचे कार्यक्षेत्र या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहे. संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, या चाचणीमुळे स्पेशल फोर्सेस कमांडमध्ये (एसएफसी) याचा सहभाग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले की, जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी घेण्यात आली. डीआरडीओने सांगितले की, १७ मीटर लांब आणि ५० टन वजनाच्या या क्षेपणास्त्राने आपल्या सर्व लक्ष्यांना भेदण्यात यश मिळविले. यापूर्वी १९ एप्रिल २०१२ रोजी पहिली, १५ सप्टेंबर २०१३ रोजी दुसरी आणि ३१ जानेवारी २०१५ रोजी तिसरी चाचणी करण्यात आली होती. अग्निच्या मालिकेतील हे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. इंजिनाशी संबंधित नव्या तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याच दरम्यान स्वदेश निर्मित अनेक तंत्रज्ञानाचीही चाचणी घेण्यात आली. इनर्शियल नेव्हीगेशन सिस्टीम आणि सर्वात आधुनिक माइक्रो नेव्हिगेशन सिस्टिमने काही क्षणातच लक्ष भेदले. वेगवान कॉम्युटर व चूक शोधून काढणाऱ्या सॉफ्टवेअरने या क्षेपणास्त्राला मार्गदर्शन केले. (वृत्तसंस्था)अग्निचा चढता आलेख : भारताकडे सद्या वेगवेगळ्या क्षमतेचे क्षेपणास्त्र आहेत. ७०० किमीचा टप्पा गाठणारे अग्नि १, तर २००० किमीच्या लक्ष्याला भेदणारे अग्नि २, तसेच २५०० किमी पर्यंतच्या लक्ष्याचा भेद घेणारे अग्नि ३ व ४ आणि आता चीनपर्यंत मजल मारु शकणारे अग्नि ५ अशी ही यशाची चढती कमान आहे. - अग्नि ५चे यशस्वी प्रक्षेपण करण्याअगोदर ह्या क्षेपणास्त्राचे दर्शन दिल्लीत झालेल्या परेडमध्ये सर्वांना घडविण्यात आले होते. भारताच्या अण्वस्त्रवाहू शक्तीची ही चौथी चाचणीही आता पार पडली.
‘अग्नि-५’मुळे चीन, रशियावरही टाकता येईल भारताला अणुबॉम्ब!
By admin | Published: December 27, 2016 12:43 AM