यशस्वी चाचणी : ५ हजार कि.मी.पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमताबालासोर : भारताने ५००० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेतली. अंदाजे एक टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राने ओडिशाच्या व्हिलर बेटावरून आकाशात यशस्वी झेप घेतली. हे क्षेपणास्त्र सडक अथवा रेल्वे मार्गाने कोणत्याही ठिकाणी वाहून नेले जाऊ शकते आणि कोणत्याही ठिकाणावरून डागता येते.सकाळी ८.०६ वाजता इंटेग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स-४ वरून मोबाईल लाँचरद्वारा हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती आयटीआरचे संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी दिली. आजची चाचणी अत्याधुनिक सचल प्रक्षेपकाद्वारे करण्यात आली. हे प्रक्षेपक (लाँचर) सडक मार्गाने कोणत्याही स्थळी नेले जाऊ शकते. खुल्या प्रक्षेपणाच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी वेळाच्या तयारीत डागले जाऊ शकते. विश्वसनीयता, दीर्घायुष्य, देखभालीचा कमी खर्च आणि कोणत्याही भागात नेण्याची क्षमता हे या प्रक्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य आहे. डीआरडीओचे मावळते महासंचालक अविनाश चंदर म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण आहे. कॅनिस्टरद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे भारताचे पहिलेच आयसीबीएम आहे. देशाच्या प्रतिरोधक क्षमतेसाठी ही मोठी उपलब्धी आहे.’ (वृत्तसंस्था)‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रात नवे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचे ऐकून मला मोठा आनंद झाला आहे. तुमच्या या अथक परिश्रमासाठी देश सदैव आभारी राहील. या देशाला तुमचा अभिमान आहे,’ असे मुखर्जी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.डीआरडीओचे महासंचालक आणि संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अविनाश चंदर यांना पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे.
‘अग्नी-५’ची पल्लेदार झेप
By admin | Published: January 31, 2015 11:54 PM