नवी दिल्ली- अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा 24 पटीनं सुस्साट जाणाऱ्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची पाचवी चाचणी यशस्वी झाली आहे. 5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदू शकणाऱ्या या शक्तिशाली क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानसोबतच चीनही भारताच्या टप्प्यात आला आहे.
ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी अग्नि-5 झेपावलं. डीआरडीओनं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची चौथी चाचणी डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. तीही यशस्वी ठरली होती आणि ही शेवटची चाचणी असल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, आज वर्षभरानंतर या क्षेपणास्त्राची पुन्हा चाचणी घेण्यात आली आणि त्यातही या क्षेपणास्त्राने जवळपास सर्व निकष पूर्ण केले. अग्नि-5 क्षेपणास्त्र 17 मीटर उंच असून त्याचं वजन 50 टन आहे. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रं वाहून नेऊ शकतं.
एप्रिल 2012 मध्ये अग्नि-5 ची पहिली चाचणी झाली होती. त्यानंतर, सप्टेंबर 2013 मध्ये त्याचं पुन्हा परीक्षण झालं. तिसरी आणि चौथी चाचणी अनुक्रमे जानेवारी 2015 आणि डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. आजच्या चाचणीनंतर अग्नि-5 ने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये दाखल होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता हे क्षेपणास्त्र भारताचं ब्रह्मास्त्र होण्यासाठी सज्ज आहे की आणखी काही चाचण्यांची आवश्यकता आहे, हे डीआरडीओकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.