नवी दिल्ली: पोखरणमध्ये 20 वर्षांपूर्वी अणूचाचणी करुन जगाला आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. दोन दशकानंतर आता पुन्हा भारत आपल्या ताकदीचं दर्शन संपूर्ण जगाला घडवणार आहे. भारताकडूनच लवकरच अग्नी-5चं अनावरण केलं जाईल. हे भारताचं पहिलंच आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असेल. या क्षेपणास्त्राचा समावेश स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडच्या (एसएफसी) अंतर्गत करण्यात येईल.5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी-5 ची यंत्रणा आणि उपयंत्रणा एसएफसीकडे सोपवण्यात आल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील. 'अग्नी-5 ची दुसरी चाचणी लवकरच होणार आहे. या चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली आहे,' अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे (एसएफसी) आधीपासून अनेक त्रिस्तरीय क्षेपणास्त्र आहेत. यामध्ये पृथ्वी-II (350 किमी.), अग्नि-I (700 किमी.), अग्नि-III (3,000 किमी) यांचा समावेश आहे. यासोबतच सुखोई-30 एमकेआय, मिराज-2000 आणि जॅग्वार ही लढाऊ विमानं अण्वस्त्र हल्ले करण्यात सक्षम आहेत.
अग्नी-5ची लवकरच चाचणी; संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 4:23 PM