एस. पी. सिन्हापाटणा :
सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
बिहारमध्ये आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅक जाम केला, तर मुझफ्फरपूरमधील मादीपूरमध्ये आग लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आरा येथेही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलक भरती योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.- केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या योजनेनुसार सैन्याच्या तिन्ही दलात तरुणांची भरती केली जाणार आहे. या तरुणांना चार वर्षे सैन्यात सेवा द्यावी लागणार आहे.
दगडफेक अन् चक्काजामबिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली. मुजफ्फरपूरमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले. या तरुणांनी बेगुसरायमध्येही निदर्शने केली.
तरुण काय म्हणतात...?- मुजफ्फरपूरमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांनी बुधवारी सकाळी सैन्य भरती बोर्डाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. सरकारची योजना ही योग्य नाही. - चार वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. चार वर्षांत आमचे काय होणार आहे. पेन्शनची सुविधाही नाही, असे या तरुणांनी स्पष्ट केले. माजी लष्करप्रमुख काय म्हणतात...?अग्निपथ योजनेमुळे लष्कराची रचना बिघडणार का? माध्यमांच्या या प्रश्नावर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह म्हणाले की, कोणतीही नवीन गोष्ट जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत त्याबद्दल अधिक माहिती नसते. ज्या टीमने ही योजना बनवली, त्या टीमचा मी भाग नाही. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. योजना नुकतीच जाहीर झाली आहे. पुढे काय होते ते पाहू.